- आमच्याबद्दल -
सर्वप्रथम आपल्याला जय शिवराय !
आपल्याला तर माहीतच असेल, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यापुढे उभा राहतो तो धगधगता इतिहास.
स्वराज्याचा १००० होनांपासून प्रदेशाचा ते १.५ कोटी होनांपर्यंतच्या प्रदेशाचा जो संघर्ष आहे, त्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे आपले गडकिल्ले ! छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी आपल्या जीवापेक्षा जास्त ज्यांना जपलं, प्रसंगी जीव सुद्धा पणाला लावला, ते म्हणजे आपले गडकिल्ले.
पण, आजची त्यांची अवस्था कशी आहे ?
कचऱ्याचे ढीग, वाढलेले अतिक्रमण, पडक्या भिंती आणि जमीनदोस्त झालेले बालेकिल्ले ! स्वराज्य तर निर्माण झालं, पण त्याच स्वराज्याच आज सुराज्य होताना आपलं गडकोटांकडे मात्र दुर्लक्ष झालं. म्हणूनच तर महाराष्ट्रातील जवळजवळ सगळे गडकोट आज संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत.
हीच गोष्ट बॉर्डर वर असताना एका फौजी डोक्यात सतत सलत होती, आणि त्याचमधून निर्माण झाला "राजा शिवछत्रपती परिवार"; दिनांक होता, ३१ जुलै २०१४. गडकोट संवर्धन हे प्राथमिक उद्दिष्ट तसेच वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, गरजूंना मदत, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन, इत्यादी इतर ध्येय मनात ठेवून श्री. सुनील सूर्यवंशी यांनी परिवाराची स्थापना केली.
परिवाराची पहिली मोहीम ५ एप्रिल २०१५ रोजी किल्ले पन्हाळगड येथे अवघ्या ११ मावळ्यांसमवेत पार पडली. त्यानंतर आजतागायत परिवाराच्या ८००+ विभागीय दुर्गस्वच्छता मोहीमा, १५ मुख्य मोहीमा, ३ महाद्वार लोकार्पण सोहळे, अनेक मदत मोहीमा, फराळ वाटप मोहीमा पार पडल्या.